अनावश्यक अॅन्जिओप्लास्टी टाळता येणे आता शक्य : डॉ. सुधीर शेतकर
अत्याधुनिक एफएफआर तंत्रज्ञान हृदयरुग्णांसाठी एक प्रकारे वरदानच असून, त्यामुळे अनावश्यक अॅन्जिओप्लास्टी टाळता येणे आता शक्य होणार आहे, अशी माहिती अपोलो हॉस्पिटलचे विख्यात हृदयरोगतज्ज्ञ (Cardiologist in Nashik) डॉ. सुधीर शेतकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रुग्णांची अॅन्जिओग्राफी केल्यानंतर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असल्यास त्याला कोरोनरी आर्टरी डिसीज असे म्हटले जाते. आतापर्यंत हृदयाच्या रक्तवाहिनीतील ब्लॉकेज बघण्यासाठी अॅन्जिओग्राफी ही एकमेव तपासणी होती. अॅन्जिओग्राफी केल्यानंतरच हे निष्पन्न होते, की अॅन्जिओप्लास्टी करावी की बायपास शस्त्रक्रिया. हार्ट ब्लॉकेज असलेल्या रुग्णांसाठी एक चांगली बातमी आहे, की प्रत्येक ब्लॉकला ओपन हार्ट सर्जरी किंवा अॅन्जिओप्लास्टीची आवश्यकता नसते. मग कसे ठरवायचे की हा ब्लॉक त्रास देणार आहे की नाही, कसे ठरवायचे की या ब्लॉकची अॅन्जिओप्लास्टी करून काही फायदा होणार की नाही याबाबत बोलताना डॉ. शेतकर पुढे म्हणाले, की अॅन्जिओग्राफी आपण रक्तवाहिन्यांतील ब्लॉकेजेस बघतो आणि त्या ब्लॉकेजने खरेच हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी आतापर्यंत कोणताच अचूक पर्याय नव्हता. आतापर्यंत आपण स्ट्रेस टेस्टद्वारे हे ठरवायचे की एखाद्या ब्लॉकला अॅन्जिओप्लास्टीची गरज आहे किंवा नाही; परंतु या टेस्टला बऱ्याच मर्यादा आहेत. फ्रेंक्शनल फ्लो रिझर्व्ह (एफएफआर) हा एक नवीन अत्याधुनिक आविष्कार आहे, ज्याने हा प्रश्न संपुष्टात आलेला आहे. हृदयाच्या रक्तवाहिनीमधला इंट्रो कोरोनरी प्रेशर (दाब) व प्रवाह मोजून ही प्रणाली माहिती देते, की.
ब्लॉकेजमुळे हृदयाला खरेच रक्तपुरवठा कमी होतो आहे किंवा नाही. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण रुग्णावर होणारी अनावश्यक अॅन्जिओप्लास्टी टाळू शकतो. एफएफआरद्वारे आपल्याला वैज्ञानिक पुरावा मिळतो की अॅन्जिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया करण्याची खरेच गरज आहे की नाही, एफएफआरमध्ये एक विशिष्ट तार ज्यामध्ये एक प्रेशर सेन्सर असतो. तो रक्तवाहिनीमध्ये ठेवण्यात येतो त्याद्वारे आधीचे व ब्लॉकच्या पुढचे प्रेशर मोजण्यात येते. ब्लॉक जास्त नसेल, तर दोन्ही बाजूस प्रेशरमध्ये जास्त अंतर नसते. दोन्ही बाजूचा दाब सारखा असेल, तर त्याचा एफएफआर १ असतो. जसा ब्लॉकेज वाढतो, तसे ब्लॉकच्या पलीकडील प्रेशर कमी होत जाते व एफएफआर कमी होतो.
एफएफआर ०.८० याचा अर्थ असा की ब्लॉकेज इतका जास्त आहे, की हृदयाला २० टक्के रक्तपुरवठा कमी होतो. ज्यांचा एफएफआर ०.८० पेक्षा जास्त आहे त्यांच्यावर फक्त औषधोपचाराद्वारे उपचार करणे शक्य आहे. अशाप्रकारे ब्लॉकेजचा एफएफआर मोजून आपण अनावश्यक अॅन्जिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया टाळू शकतो. नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये आपण उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे पन्नास रुग्णांवर एफएफआर या आधुनिक तपासणीचा वापर केला आहे. ज्यात वीस रुग्णांवर अनावश्यक अॅन्जिओप्लास्टी करण्याची गरज नाही असे निष्पन्न झाले. हार्ट ब्लॉकेज असणाऱ्या रुग्णांसाठी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आशेचा नवीन किरणच म्हणावा लागेल, असेही डॉ. शेतकर यांनी सांगितले, पत्रकार परिषदेत हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरी मेनन व हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर अभयसिंह वालिया हेही उपस्थित होते.