मधुमेह व ब्लडप्रेशर असणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण जास्त असून हृदयविकार आल्यानंतर पहिल्या तीन तासांत योग्य उपचार मिळाल्यास रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी होऊ शकते असा सूर जागतिक हृदयदिनानिमित्त आयोजित ‘निरोगी हृदय’ या विषयावरील परिसंवादात उमटला.
नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने जागतिक हृदय दिनानिमित्त आयोजित परिसंवादामध्ये अपोलो हॉस्पिटलचे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. अभयसिंग वालिया व डॉ. सुधीर शेतकर (Cardiologist in Nashik)यांनी सहभाग घेतला.
यावेळी अधिक माहिती देताना डॉ. सुधीर शेतकर म्हणाले, की हृदयविकाराची लक्षणे मुख्यत्वे पोटात जळजळ होणे, हृदयाच्या डाव्या बाजूला दुखणे, एका हाताला मुंग्या येणे, चालताना दम लागणे, अतिचरबीचे प्रमाण यासारखी कारणे जाणवल्यास त्वरित हृदयविकार ‘तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
हृदयविकार टाळण्यासाठी तंबाखूचे सेवन न करणे, बसून न राहणे, हालचाल करणे, धूम्रपान, तेलकट पदार्थाचे सेवन न करणे, मटण न खाता मासे खाणे, रोज अर्धा तास जोरात चालणे, दोन ते तीन जिने चढउतार करणे, प्रकृतीला झेपेल इतका व्यायाम करणे यासारख्या गोष्टी आचरणात आणल्यास हृदयविकार टाळता येतो असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमात प्रामाणिकपणे रुपये दीड लाखांची रक्कम परत करणाऱ्या रिक्षावाला छोटू पाटील व • सिव्हील हॉस्पिटलमधील बालरोगतज्ञ डॉ. गाजरे, डॉ. ठाकूर आणि कर्मचारी भावना कंडाळे यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष देवराम सैंदाणे यांनी डॉ. अभयसिंग वालिया व डॉ. सुधीर शेतकर, अपोलोचे मार्केटिंग हेड डॉ. मंगेश जाधव, लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचाचे कोषाध्यक्ष जितेंद्र येवले यांना श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष देवराम सैंदाणे, सूत्रसंचालन सावळीराम तिदमे यांनी केले तर आभारी नंदकुमार दुसानिस यांनी मानले. या कार्यक्रमासाठी जयराम गवळी, रमेश सोनवणे, दिनकर शेळके, सुखदेव भामरे, दत्तात्रय खांडरे, आत्माराम देसले, अलका गारसे, प्रमिला पांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.