२०२० पर्यंत जगातील सर्वात जास्त हृदयरोगी भारतात असतील. देशातील एक तृतीयांश मृत्यू हृदय रोगामुळे होतील. आणि त्यातही कमी वयात (म्हणजे ४५ वर्षापेक्षा कमी) होणारे हृदयविकाराच्या मृत्यूमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. सध्या तर ३३ सेकंदाला आपल्या देशात एक व्यक्ती हृदयविकाराच्या धक्क्यामुळे मृत्यू पावत आहे. बदललेली तणावपूर्ण जीवनशैली, डायबेटीस, उच्च रक्तदाब, व्यायामाचा अभाव, वाढता लठ्ठपणा आणि सर्वांत महत्त्वपूर्ण म्हणजे तंबाखूचा वाढता बापर हे सर्व हृदयविकाराच्या वाढत्या प्रमाणासाठी प्रामुख्याने कारणीभूत आहेत.
आपल्या हृदयाला तीन रक्त वाहिन्यांद्वारे रक्तपुरवठा करण्यात येतो. रक्तवाहिनी आपापल्या भागाला रक्त पुरवठा करते. एखादी रक्तवाहिनी जर रक्ताच्या गुठळीमुळे पूर्णपणे बंद झाली, तर हृदयाच्या त्या भागाचा रक्तपुरवठा खंडित होतो.
जर वेळेवर हा रक्तपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही तर हृदयाचा तो भाग कायमचा मृत होतो आणि हृदयाचे पंपिंग कमी होते. जर रक्तवाहिनी बंद राहिली तर ताशी ८ टक्के हृदयाचा भाग कायमचा मृत होत जातो. आणि १२ तासांनंतर पूर्ण भाग मृत होतो. अचानक कमी झालेल्या पंपिंगमुळे हार्ट फेल होऊ शकते (कार्डिओजनिक शॉक) किंवा काही रुणांमध्ये हृदयाचे ठोके कमी झाल्यामुळे मृत्यू होऊ शकतो. त्वरित ब्लॉक झालेली रक्तवाहिनी मोकळी केल्याशिवाय दुसरा विकल्प नसतो. जेवढ्या रक्तवाहिन्या त्वरित मोकळ्या करण्यात यश येईल तेवढ्या हृदयाच्या भागाला आपण वाचवू शकतो.
हृदयाला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी पूर्णपणे ब्लॉक झाली असेल तर त्याला दोन पर्याय आहेत. यात रक्त पातळ करण्याकरिता इंजेक्शन घेऊन रक्तवाहिनीसाठी मार्ग करणे (ज्याला थ्रोम्बोलिसीस म्हणतात किंवा प्रत्यक्ष डोळ्यांसमोर रक्तवाहिनी पाहून तिला मोकळे करणे, ज्याला प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणतात. यातील दुसऱ्या पर्यायात प्रायमरी अँजिओप्लास्टी ही रक्त मोकळी करण्यात ९५ टक्केपेक्षा जास्त कैसेसमध्ये यशस्वी होते आणि थ्रोम्बोलिसीसपेक्षा प्रायमरी अँजिओप्लास्टीमध्ये रक्तस्रावाचा धोकादेखील कमी होतो. सध्या ही सर्वोत्तम उपचार पद्धती आहे.