अपोलो हॉस्पिटलमध्ये २६ वर्षांच्या तरुणावर हृदयाची दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. आतापर्यंत जगभरात अशा स्वरूपाच्या नऊ शस्त्रक्रियाच झाल्याची माहिती कार्डीयाक सर्जन डॉ. अभयसिंग वालिया व कार्डीओलॉजिस्ट डॉ. सुधीर शेतकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. शेतकर (Cardiologist in Nashik) म्हणाले, की राजेश (नाव बदलले आहे) या तरुणाला श्वासोच्छ्वासाचा तसेच थकण्याचा त्रास होता. आतापर्यंत त्याच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदान अनेकांनी केले मात्र शस्त्रक्रिया करायला कोणी तयार नव्हते. अपोलोने केलेल्या निदानात या तरुणाच्या हृदयाला तीन प्रकारच्या समस्या होत्या. डाव्या आणि उजव्या हृदयाच्या मधोमध छिद्र होते. शुद्ध व अशुद्ध असे रक्त एका वाहिनीमुळे एकत्र होत होते. तर अशुद्ध रक्त वाहून नेणारी वाहिनी व्हॉल्व अरूंद असल्याने
हृदयातून फुप्फुसाला रक्त पुरवठ्यात अडथळे निर्माण होतात. या प्रकाराला ‘मेडिकल टर्ममध्ये टोटल अॅनॉमॉलस पल्मनरी व्हिनस कनैक्शन वुईथ पल्मनरी स्टेनोसिस’ असे म्हणतात. या निदान व त्यावरील शस्त्रक्रिया किचकट होती कारण भारतातील ही पहिलीस केस असावी.
डॉ. वालिया म्हणाले, की हे तिन्ही अडथळे एकाच शस्त्रक्रियेत दूर करण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. अपोलीच्या कार्डीयाक टीमने साडेचार तासात शस्त्रक्रिया पूर्ण करून या तरुणाला नवीन जीवन दिले आहे. काही तासांतच तरुणाच्या हृदयातील सर्व प्रक्रिया सर्वसामान्य हृदयाप्रमाणे सुरू झाली आहे. या शस्त्रक्रियेत डॉ. वालिया, डॉ. शेतकर, डॉ. एस. अन्नछत्रे, काडयाक निस्थेशिस्ट डॉ. भुपेश पराते व अपोलोची टीम सहभागी झाली होती.